Home Breaking News अनाथ व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संपर्क संस्थेचे प्रयत्न वाखाणण्याजोगे – आमदार सुनील...

अनाथ व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संपर्क संस्थेचे प्रयत्न वाखाणण्याजोगे – आमदार सुनील अण्णा शेळके

83
0
मळवली, भाजे : शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे ध्येय घेऊन काम करणाऱ्या संपर्क संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे. बेलारूस येथील झुब्रेनोक पार्क येथे झालेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बाल मेळाव्यात संस्थेच्या २४ विद्यार्थ्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत कला, परंपरा आणि संस्कृती जगासमोर सादर केली. या विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करण्यासाठी संपर्क लिली इंग्लिश मीडियम स्कूल, भाजे-मळवली येथे भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यास मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरव केला आणि त्यांचे कौतुक करताना म्हटले की,“अनाथ व गावागावातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य संपर्क संस्था करत आहे, त्यांना गावातील ग्रामस्थांनी साथ देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.”
कार्यक्रमाच्या वेळी संपर्क संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, विश्वस्त किरण हुलावले, विश्वस्त रत्ना बॅनर्जी, हरिभक्त परायण तुषार महाराज दळवी, भाजे सरपंच प्रिया ओहाल, उपसरपंच उज्वला काळे तसेच स्थानिक सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, माजी सरपंच व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक चेतन देशमुख यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला तर बेलारूस दौऱ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थिनीने आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील सहभागाची चित्रफीतही उपस्थितांना दाखवण्यात आली.
संपर्क संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रदीप वाडेकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन विश्वस्त किरण हुलावले यांनी मानले.
संपर्क संस्थेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व अनाथ विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळाली आहे. गावोगावच्या नागरिकांनी अशा उपक्रमांना अधिक पाठबळ दिल्यास, भविष्यातील पिढी अधिक सक्षम व जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास समर्थ बनेल.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मावळच्या विद्यार्थ्यांचा जलवा – संपर्क संस्थेच्या गुणगौरव सोहळ्यात आमदार सुनील अण्णा शेळके यांचे प्रतिपादन