Home Breaking News १६६ व्या आयकर विभागाच्या स्थापना दिनाचा भव्य सोहळा; राज्यपालांच्या हस्ते कौटिल्य मूर्तीचे...

१६६ व्या आयकर विभागाच्या स्थापना दिनाचा भव्य सोहळा; राज्यपालांच्या हस्ते कौटिल्य मूर्तीचे अनावरण व आदर्श करदात्यांचा सत्कार!

36
0
मुंबई | १६६ व्या आयकर विभागाच्या स्थापना दिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन मुंबईतील कौटिल्य भवन, बीकेसी येथे करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राज्यपालांच्या हस्ते आर्थिक शिस्त आणि नीतीशास्त्राचे जनक कौटिल्य (चाणक्य) यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करून झाली.
या वेळी आयकर अपीलीय न्यायाधिकरणाचे उपाध्यक्ष शक्तिजित डे, प्रमुख मुख्य आयुक्त मालती श्रीधरन, तसेच अनेक मोठ्या करदाते कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, विभागातील अधिकारी आणि निवृत्त अधिकारी उपस्थित होते.
राज्यपालांनी आपल्या भाषणात करदात्यांच्या योगदानाचे कौतुक करताना सांगितले की, “देशाच्या आर्थिक स्थैर्यात आणि विकासात करदात्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे.”
या कार्यक्रमात आयकर विभागाच्या वतीने अनेक प्रमुख करदाते कंपन्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा सन्स प्रा. लि., एचडीएफसी बँक, आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांचा समावेश होता. याशिवाय विभागातील निवृत्त अधिकारी व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक सोहळा नसून, करदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि आयकर विभागाच्या कार्याची सन्मानपूर्वक आठवण करून देणारा क्षण ठरला.