Home Breaking News श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ‘ऐश्वर्या कट्टा’वर मुक्त संवाद, संघर्षमय प्रवासाची दिलखुलास...

श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ‘ऐश्वर्या कट्टा’वर मुक्त संवाद, संघर्षमय प्रवासाची दिलखुलास मैफल

13
0
पुणे : पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या पुरवण्याचं माध्यम नसून ती समाजाशी जोडलेली एक जबाबदारी असते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं ‘ऐश्वर्या कट्टा’वर झालेल्या एका विशेष संवादात. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नव्याने निवडून आलेले पदाधिकारी जेव्हा कट्ट्यावर आले, तेव्हा त्यांच्या संघर्षांनी भारलेला आणि अनुभवांनी समृद्ध असा संवाद उपस्थितांनी अनुभवला.
बाहेर रिमझिम पावसाची सर सुरू होती, आणि आत पत्रकारितेच्या ‘खमंग’ आठवणींनी गारवा निर्माण केला होता. ‘कट्टा’ वर अनेकदा चर्चांना उधाण येतं, पण यावेळी चर्चा नव्हे तर एक जिव्हाळ्याची, प्रेरणादायी गोष्ट उलगडत होती… विचार, विनोद आणि वास्तवाचं सुंदर मिश्रण!
 उपस्थित मान्यवरांनी दिलखुलासपणे व्यक्त केलं मन
▪️ अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील (सकाळ)
त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध ‘बिन मांगे ग्यान’ सदराच्या आठवणी सांगत सोशल मीडियावरचा प्रभाव, समाजातील बदलते ट्रेंड्स, राजकारण व लोकप्रतिनिधींच्या निवडीबाबत परखड मत व्यक्त केलं. “समाज बदलतोय, पण आत्मपरीक्षण ही काळाची गरज आहे,” असं ते ठामपणे म्हणाले.
▪️ सरचिटणीस मंगेश फल्ले (दिव्य मराठी)
त्यांनी चीनमधील ग्रामीण रचना व भारतातील वास्तव यांची अभ्यासपूर्ण तुलना करत, आपल्या पत्रकारितेच्या वाटचालीतील अनेक चढ-उतार कथन केले. दृढनिश्चय, चिकाटी आणि सामाजिक भान हे पत्रकाराच्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, हे त्यांच्या अनुभवांतून स्पष्ट झालं.
▪️ खजिनदार दिलीप तायडे (केसरी)
दिलीपजींनी ‘केसरी’ची गौरवशाली परंपरा, लोकमान्य टिळकांच्या विचारांची प्रेरणा आणि आजही चालू असलेली मूल्यनिष्ठ पत्रकारिता यावर प्रभावी भाष्य केलं.
▪️ चिटणीस तनिष्का डोंगरे (सकाळ)
ताज्या पिढीतील प्रतिनिधी तनिष्काने निवेदन, एडिटिंग आणि महिला पत्रकारितेचा अनुभव समोर ठेवला. कट्ट्यावर महिलांची वाढती उपस्थिती पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला, आणि “महिलांनीही पत्रकारितेच्या सर्व क्षेत्रात नेतृत्व करावं,” अशी प्रेरणा दिली.
▪️ सदस्य निलेश चौधरी (पुण्यनगरी)
निलेश चौधरींनी पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांच्या प्रेरणादायी प्रवासाचं सुंदर चित्रण केलं. “एका वृत्तपत्र विक्रेत्याचा संपादक होण्यापर्यंतचा प्रवास, ही प्रेरणादायक कहाणी आहे,” असे ते म्हणाले.
कट्ट्यावर संवाद, विचार आणि आठवणींची बरसात
या कार्यक्रमात कट्ट्याचे सदस्य, अप्पा रेणुसे मित्र परिवार, युवा पत्रकार, वाचक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तासाभर चाललेला हा कार्यक्रम गंभीर, विनोदी आणि हृदयस्पर्शी वळणांनी भरलेला होता. प्रत्येक वक्त्याने आपलं अंतर्मन उघडपणे समोर ठेवलं, त्यामुळे उपस्थितांची मनं भारावून गेली.
 पत्रकार कट्ट्याच्या नव्या पर्वाला सुरुवात
‘ऐश्वर्या कट्टा’ हा केवळ चर्चा करण्याचा कट्टा नसून, तो एक विचारांची देवाण-घेवाण करणारा हक्काचा संवादमंच बनला आहे. अशा संवादातून पत्रकारितेच्या नव्या पिढीला दिशादर्शन मिळत असून, एक नवा सामाजिक व बौद्धिक अध्याय उघडतोय.