पिंपरी-चिंचवड | शिवतेजनगर : श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण असलेली नागपंचमी शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढंगात साजरी करण्यात आली. श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये परिसरातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
या विशेष कार्यक्रमासाठी ६ फूट उंच नागाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती, जी मंदिराच्या प्रांगणात मुख्य आकर्षण ठरली. या प्रतिकृतीसमोर महिलांनी पारंपरिक वेशभूषेत अत्यंत भक्तिभावाने नागदेवतेचे पूजन केले.
कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगरसेविका योगिता नागरगोजे व पुष्पा बोत्रे यांच्या हस्ते पूजन व झोक्याच्या उद्घाटनाने झाला. महिलांसाठी खास झोके बांधण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांनी उत्साहात झोका खेळत पारंपरिकतेचा आनंद घेतला.
त्यानंतर पारंपरिक खेळांचा रंगतदार कार्यक्रम झाला, ज्यामध्ये झिम्मा, फुगडी, फेर, उखाणे आणि गाणी यांचा समावेश होता. संपूर्ण वातावरणात उत्सवाचे, आपुलकीचे आणि एकात्मतेचे चैतन्य अनुभवायला मिळाले.
श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा गुणवंत, सारिका रिकामे, क्षमा काळे, अंजली देव, स्मिता सिरसाठ, मंगल काळे, प्रीती झोपे, सविता राणे आणि नीलिमा भंगाळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण आयोजन उत्तमरित्या सांभाळले.
महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्यांमध्ये सजून या सोहळ्यात हजेरी लावत आपल्या संस्कृतीचा जागर केला. नागपंचमीसारख्या सणाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा गौरव आणि एकतेचे प्रतीक ठरलेला हा कार्यक्रम अनेकांच्या मनात घर करून गेला.