मुंबई : आजपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रमुख नेत्यांनी विधानभवन परिसरातील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कृतज्ञतेने अभिवादन करून आपल्या भूमिकेची ठाम सुरुवात केली.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही सकाळी विधानभवन परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि नतमस्तक होऊन अभिवादन केलं.
राज्याच्या विकासासाठी बांधिलकी व्यक्त या अभिवादनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिन्ही नेत्यांनी राज्याच्या जनतेसाठी सकारात्मक, विकासाभिमुख निर्णय घेण्याची बांधिलकी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याच विचारांचा आधार घेत आम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नवे निर्णय घेणार आहोत.” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट केलं की, “जनतेच्या मुद्द्यांना महत्त्व देत, यंदाच्या अधिवेशनात सर्वपक्षीय संवाद आणि ठोस धोरण राबवण्यावर भर दिला जाईल.” तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “गावोगावच्या समस्यांवर आता निर्णय घेतले जातील. हे अधिवेशन महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे ठरेल.”
सामंजस्य आणि नेतृत्वाचे दर्शन या अभिवादन प्रसंगात महायुतीतील सामंजस्य, एकात्मता आणि मजबूत नेतृत्वाचे दर्शन घडले. या नेत्यांच्या एकत्र उपस्थितीमुळे विधानभवन परिसरात सशक्त राजकीय संदेशही गेला. अनेक अधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.
पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचे विधेयकं, चर्चा अपेक्षित यंदाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न, पावसामुळे झालेलं नुकसान, आरोग्य, शिक्षण, पाणीटंचाई यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून काही महत्वाची विधेयकं सादर होण्याचे संकेत आहेत.