पेण (रायगड) : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा, केकचा आणि सजावटीचा दिवस नसतो, तर तो प्रेम, आपुलकी आणि संवेदनशीलतेचा सुद्धा असतो, याचा अनुभव मिळाला सुहित जीवन ट्रस्टच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भेटीने. पेण येथील या विशेष शाळेतील मुलांनी वाढदिवसाच्या दिवशी खास भेट देत आपापल्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
या निरागस मुलांच्या हास्याने, निरागस भावना व्यक्त करत दिलेल्या शुभेच्छांनी संपूर्ण वातावरण आनंदमय झालं. त्यांचं कोवळं प्रेम, निरागस बोलणं आणि डोळ्यांतून ओसंडणारा आत्मविश्वास पाहून मन भारावून गेलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिव्यांग मुलांनी दिलेल्या शुभेच्छा म्हणजे खऱ्या अर्थाने ईश्वरी आशीर्वाद आहेत.
या भेटीदरम्यान विविध लघु सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तनिर्मित शुभेच्छापत्रे, गाणी आणि संवादाद्वारे विद्यार्थ्यांनी प्रेम व्यक्त केलं. त्यांच्या हस्तकलेतील कौशल्य आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केलं.
शेवटी वाढदिवसाच्या दिवशी असा निरागस, पवित्र आणि मनाला स्पर्श करणारा क्षण मिळाल्याबद्दल सर्व मुलांचे आणि सुहित जीवन ट्रस्टच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानण्यात आले.
“या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात नेहमीच प्रेम, आत्मविश्वास आणि यश नांदत राहो,” हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”