वसई (खोचिवडे) – वसई पश्चिमेतील खोचिवडे गावातील कुरणवाडी परिसरात शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा भीषण डाव गावकऱ्यांनी उधळून लावत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. तृतीयपंथीयांचा वेष परिधान करून आलेल्या चार जणांनी एका मुलासह तीन मुलींचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, संतप्त गावकऱ्यांनी या चौघांना बेदम चोप दिला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण वसई परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या आरोपींमध्ये तीन पुरुष तृतीयपंथीयांच्या वेषात होते आणि त्यांच्यासोबत एक रिक्षा चालक देखील होता. ही टोळी गावातील मुख्य रस्त्यालगत गस्त घालत होती. शाळेतून घरी परतणाऱ्या मुलांना त्यांनी चाकूचा धाक दाखवून थांबवलं आणि रस्त्यात अडवून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला. आरडाओरड ऐकताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वेळेवर हस्तक्षेप करत सर्व मुलांना या टोळीच्या तावडीतून सोडवलं.
गावकऱ्यांनी चारही संशयितांना पकडून त्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर वसई पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चौघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, या टोळीचा हेतू घातक होता आणि त्यांना वेळेत रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आता ही टोळी एका टोळक्याचा भाग तर नव्हे ना, याचा तपासही पोलिस करत आहेत.
🔹 या घटनेनंतर पालकांनी शाळकरी मुलांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. 🔹 पोलीस प्रशासनाने शाळा सुटण्याच्या वेळेस गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. 🔹 तृतीयपंथीय समुदायातील खरे सदस्य यामुळे बदनाम होत असल्याची चिंता देखील व्यक्त होत आहे.