Home Breaking News लोणावळा नगरपरिषदेचा राष्ट्रीय गौरव! राष्ट्रपतींकडून “सुपर स्वच्छ लीग” मध्ये विशेष सन्मान

लोणावळा नगरपरिषदेचा राष्ट्रीय गौरव! राष्ट्रपतींकडून “सुपर स्वच्छ लीग” मध्ये विशेष सन्मान

22
0
लोणावळा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 व 2025 मधील “सुपर स्वच्छ लीग” या विशेष श्रेणीत लोणावळा नगरपरिषदेला राष्ट्रीय पातळीवर मोठे यश मिळाले असून, या कामगिरीबद्दल माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवचिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.
2021 पासून लोणावळा नगरपरिषद सातत्याने राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेच्या बाबतीत आपले स्थान बळकट करत आहे. यंदा 50 हजार ते 3 लाख लोकसंख्या गटातील शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत लोणावळ्याने नवी दिल्ली, तिरुपती आणि अंबिकापूर यांसारख्या शहरांना मागे टाकत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
विशेष म्हणजे, लोणावळा नगरपरिषदेने कचरामुक्त शहरांतर्गत 5 स्टार मानांकन मिळवले असून “वॉटर प्लस” मानांकनही सलग दुसऱ्या वर्षी टिकवून ठेवले आहे. ही कामगिरी केवळ नगरपरिषदेचीच नव्हे, तर संपूर्ण शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
नगरपरिषदेच्या या यशामध्ये शहरातील नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, प्रशासकीय अधिकारी, व रोजंदारीवर कार्यरत असलेले सफाई कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे मुख्याधिकारी श्री. अशोक साबळे यांनी स्पष्ट केले.
दिल्ली येथे पार पडलेल्या भव्य समारंभात माननीय राष्ट्रपतींनी लोणावळा नगरपरिषदेला गौरवचिन्ह प्रदान केले. या वेळी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, मुख्याधिकारी श्री. अशोक साबळे, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता श्री. यशवंत मुंडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
या सोहळ्याला उपमुख्याधिकारी श्री. शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष खाडे, श्री. विवेक फरतडे, मुकादम श्री. यशवंत वाघमारे यांचीही उपस्थिती लाभली.
स्वच्छतेच्या दिशेने लोणावळा नगरपरिषदेची ही वाटचाल केवळ पुरस्कारापुरती मर्यादित नसून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी लोणावळ्याच्या दिशेने एक ठोस पाऊल असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुख्य ठळक बाबी:
50 हजार ते 3 लाख लोकसंख्या गटात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
5 स्टार कचरामुक्त शहर मानांकन
सतत दुसऱ्या वर्षी वॉटर प्लस मान्यता
राष्ट्रपतींकडून थेट गौरव