मुंबई: महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या लॉबीत झालेल्या गोंधळानंतर राज्यात राजकीय वादळ उठले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत, “आज जर या अशा प्रकारांवर कारवाई झाली नाही, तर भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून झाले तरी आश्चर्य वाटणार नाही,” असा थेट आणि घणाघाती इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांनी सरकारच्या ‘साधनशुचिता’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “जर काही शिल्लक असेल तर स्वतःच्या लोकांवर कारवाई करून दाखवा,” असं आव्हान दिलं. त्यांनी कालच्या गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थकांमध्ये झालेल्या भांडणाचा संदर्भ घेत, यामागे राजकीय भंपकपणा असल्याचा आरोप केला.
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी वाचताना अनेकांचे अंगावर शहारे आले –
“सत्ताधारी आणि विरोधकांचे समर्थक जर विधीमंडळाच्या पवित्र ठिकाणी एकमेकांच्या अंगावर धावून जात असतील, तर लोकशाहीला कोणता आदर्श राहिला आहे? आधी मराठी माणसासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो, आता वाट पाहा… जर ही मुजोरी थांबवली गेली नाही, तर आमचे महाराष्ट्र सैनिक कोणाचीही तमा न बाळगता सरळ उत्तर देतील!”
राज ठाकरे यांच्या या थेट भाषणामुळे सरकारला तोंड द्यावे लागणारे राजकीय दडपण वाढले आहे. विधानभवन हे वादळ उठवण्यासाठी नाही, तर प्रश्नांवर उपाय काढण्यासाठी असते, हे विसरले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“हे अधिवेशन म्हणजे तमाशा!”
“राज्यातील कंत्राटदार, बेरोजगार, शेतकरी, शिक्षक यांच्यावर प्रश्नांचा डोंगर आहे. पण विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधक फक्त एकमेकांवर गलिच्छ टीका करतायत. अधिवेशनाचा खर्च लाखोंमध्ये असूनही जनतेच्या मुद्द्यांऐवजी भांडणं होतायत,” असा टोला राज यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी माध्यमांनाही आवाहन केलं की, “या भंपक वादात अडकू नका. लोकांसाठी काम करणारं कोण आहे, हे दाखवून द्या. आणि सरकारला विनंती नाही, थेट इशाराच आहे – जर कारवाई नसेल केली, तर महाराष्ट्र सैनिकच पुढाकार घेतील.”
प्रतिक्रिया उमटतायत –
राज ठाकरे यांच्या या तीव्र भाषणाने सोशल मीडियावर प्रचंड उलथापालथ झाली आहे. काहींनी त्यांचा हा आक्रमक पवित्रा योग्य मानला, तर काहींनी ते अतिशयोक्त वाटल्याचं म्हटलं आहे. पण एक गोष्ट निश्चित — महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा पेटलंय!