मुंबई | सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रेरित होऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा’साठी ₹5,55,555/- चा मदतनिधी देऊन एक सामाजिक जबाबदारी पार पाडली.
या विशेष प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी ५५,५५५ वह्यांचे मोफत वाटप करण्याचे नियोजनही आमदार कोठे यांनी केले आहे. या उपक्रमाचे वह्यांचे औपचारिक अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार मानून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्गार: “सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेणारे जनप्रतिनिधी समाजासाठी आदर्श ठरतात. आमदार कोठे यांचा उपक्रम प्रेरणादायी आहे. गरजूंसाठी अशी कृती ही केवळ आर्थिक मदत नसून माणुसकीची जिवंत उदाहरणे आहेत.”
उपक्रमाची वैशिष्ट्ये:
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹5.55 लाखांचा मदतनिधी
55,555 वह्यांचे मोफत वाटप – शिक्षणासाठी मोठी मदत
विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्याविषयी आत्मविश्वास वाढवण्याचा हेतू
समाजिक उत्तरदायित्वाचे भक्कम उदाहरण
सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना या वह्या वाटपातून थेट लाभ मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन सुसह्य व्हावे, यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली आहे.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले: “मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी, यासाठी ही दोन्ही कामे मनापासून केली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने यापुढेही असे उपक्रम राबवणार.”