मुंबई | मुंबईतील अंधेरी परिसरात रविवारी रात्री घडलेली एक घटना सध्या राज्यभरात संतापाचं वादळ निर्माण करत आहे. मनसेचे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याने भर रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत आणि दारूच्या नशेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिच्या गाडीला धडक दिली आणि तिला शिवीगाळ करत धमकावलं.
‘राजमुद्रा’ लावलेली गाडी, पण वर्तन असभ्य!
धक्कादायक बाब म्हणजे, राहिल शेखच्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि मनसेचा झेंडा होता. मराठी अस्मितेचा जयघोष करणाऱ्या झेंड्याच्या आड दारूच्या नशेत बिथरलेला राहिल शेख मराठी महिलेवर शिवीगाळ आणि दमबाजी करताना दिसतो, हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.
राजश्री मोरेने सांगितलं – “मी घाबरले होते, पण न थांबता आवाज उठवला”
राजश्री मोरे ही अभिनेत्री राखी सावंतची जवळची मैत्रीण असून, तिने या घटनेचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
“माझी गाडी थांबवून, हा माणूस अर्धनग्न अवस्थेत माझ्यावर ओरडत होता. त्याच्याकडे पाहून मला भीती वाटली. पण मी पोलिसांकडे तक्रार केली आणि आवाज उठवला,” असं तिने स्पष्ट केलं.
अंधेरीतील अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार; कडक कारवाईची मागणी
या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, राजश्री मोरेने राहिल शेखवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, संबंधित व्हिडिओ आणि पुरावे तपासले जात आहेत.

राजकीय खळबळ – संजय निरुपम यांचा संतप्त सवाल
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी मनसेवर आणि राहिल शेखवर जोरदार टीका केली आहे.
“दारू पिऊन महिलांशी गैरवर्तन करणारा हा कोणता मुस्लीम आहे? मराठीचा सन्मान करणाऱ्यांनीच जर महिलांवर शिवीगाळ केली, तर हे कोणत्या संस्कृतीचं दर्शन आहे?”