बारामती (पुणे) – बँकिंग क्षेत्रातील तणाव आणि मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. बारामती येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतील वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (वय अंदाजे ४८) यांनी गुरुवारी रात्री बँकेच्या आतच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मित्रा यांनी कामाच्या तणावामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर मित्रा हे ११ जुलै रोजी स्वतःच्या आरोग्यविषयक तक्रारी व कामाचा वाढता ताण यामुळे बँकेच्या ‘मुख्य व्यवस्थापक’ पदावरून राजीनामा देऊन नोटीस कालावधीत होते. गुरुवारी सायंकाळी बँक बंद झाल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांना घरी जाण्यास सांगितले आणि शाखा बंद करण्याची जबाबदारी स्वतः घेतली.
सुरक्षारक्षक सुद्धा रात्री ९.३० वाजता निघून गेला. त्याआधी मित्रा यांनी एका सहकाऱ्याला दोरखंड आणण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी बँकेच्या CCTV कॅमेर्यांमध्ये टिपले गेलेले दृश्यात गळफास घेतल्याचे दिसून आले.
घरी परत न आल्यामुळे आणि फोन न उचलल्यामुळे त्यांची पत्नी मध्यरात्री बँकेत पोहोचली. आतून प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिने इतर कर्मचाऱ्यांना बोलावले. दरवाजा उघडल्यावर मित्रा यांचा मृतदेह छताला लटकलेला आढळून आला. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी कोणालाही दोष न देता केवळ कामाचा प्रचंड ताण असल्याचे नमूद केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काही काळापासून वैद्यकीय उपचारही घेत होते.
या हृदयद्रावक घटनेमुळे पुन्हा एकदा बँकिंग व कॉर्पोरेट क्षेत्रातील मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले जात आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी वेळोवेळी समुपदेशन, कामाचे योग्य नियोजन व तणावमुक्त वातावरण निर्माण करणे याची गरज अधोरेखित झाली आहे. बारामती पोलीस स्टेशनने सदर प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.