Home Breaking News पुण्यात सत्ताधारी आमदाराच्या भावाकडून गोळीबार! पोलिसांची तडाखेबंद कारवाई; रोहित पवार व तृप्ती...

पुण्यात सत्ताधारी आमदाराच्या भावाकडून गोळीबार! पोलिसांची तडाखेबंद कारवाई; रोहित पवार व तृप्ती देसाई आक्रमक, सरकारवर टीकास्त्र

39
0
पुणे / दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंडमधील कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाने केलेल्या गोळीबारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर एक तरुणी जखमी झाल्याची माहिती असून, या धक्कादायक घटनेने राज्यभरात मोठी चर्चा निर्माण झाली आहे.
ही घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांनी केल्याचं उघड झाल्यानं राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. आरोपी बाळासाहेब मांडेकर याने हवेत गोळीबार केला असून, पोलिसांच्या माहितीनुसार गोळीबारानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणात दौंड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कलाकेंद्राच्या मालकासह सहा महिलांना ताब्यात घेतले आहे. तसेच, बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बाळासाहेब मांडेकर याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारला जबाबदार धरत विचारलं आहे – सत्ताधारी आमदाराचा भाऊ गोळीबार का करतोय? कारण काय? पोलिसांनी खरी माहिती जनतेपुढे आणावी.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. परंतु विरोधकांनी याचा निषेध करत सरकारवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे.
ही घटना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी असून, सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांचाच जर कायदा हातात घेतला जात असेल, तर सामान्य माणसाचं काय, असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे.