पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, हवेली, खेड, मावळ व मुळशी तालुक्यातील ३५ भूखंडांचा ऑनलाईन ‘ई-लिलाव’ करण्यात येणार आहे. हे सर्व भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्टा तत्वावर वाटप केले जाणार आहेत. या निर्णयामुळे नवीन प्रकल्प, सुविधा आणि शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेस मोठा चालना मिळण्याची शक्यता आहे.
भूखंडांचे तपशील पुढीलप्रमाणे:
▪️ ३२ भूखंड – सार्वजनिक सुविधा (Commercial / Institutional plots) ▪️ २ भूखंड – आरक्षित शैक्षणिक उद्देशासाठी ▪️ १ भूखंड – सार्वजनिक सेवा (लायब्ररी / संगीत विद्यालय यासाठी राखीव)
ई-लिलाव वेळापत्रक:
🔹 नोंदणी व निविदा दस्ताऐवज डाऊनलोड सुरू: २१ जुलै २०२५, सायं. ५.०० वा. पासून
🔹 शेवटची तारीख: ११ ऑगस्ट २०२५, सायं. ५.०० वा. पर्यंत
🔹 तांत्रिक पात्रतेची घोषणा: २१ ऑगस्ट २०२५
🔹 ई-लिलाव प्रक्रिया सुरू: २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वा.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले, “ही प्रक्रिया पारदर्शक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून सुलभ ठेवण्यात आली आहे. विकासाची संधी शोधणाऱ्या संस्था, शिक्षणसंस्था, व्यावसायिक व उद्योजकांनी या प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
पुणे परिसरात सार्वजनिक व शैक्षणिक सुविधा वाढणार
या ई-लिलावाच्या माध्यमातून नवीन शाळा, कॉलेज, वाचनालय, संगीत विद्यालय आणि इतर सामाजिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच पीएमआरडीएच्या विकास आराखड्यातील महत्त्वाच्या धोरणांना गती मिळणार असून, शहरी नियोजनाची दिशा अधिक प्रभावीपणे ठरवली जाईल.