मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान पिंपरी चिंचवड शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीला न्याय देण्यासाठी मोठी मागणी समोर आली आहे. विधान परिषदेत आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून शहराचे नाव “जिजाऊ नगर” करावे अशी ठाम मागणी सभागृहात मांडली.
राजमाता जिजाऊ यांचा गौरव करण्यासाठी आणि शहराच्या ऐतिहासिक वारशाची आठवण जपण्यासाठी हे नाव अत्यंत समर्पक ठरेल, असे आमदार खापरे यांनी स्पष्ट केले. पिंपरी, चिंचवड, भोसरी या गावांच्या एकत्रीकरणातून स्थापन झालेल्या या शहराला सध्या ‘PCMC’ म्हणून ओळखले जाते. मात्र, ही इंग्रजी संज्ञा या ऐतिहासिक नगरीच्या शौर्य आणि परंपरेशी सुसंगत नाही, असा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
उमा खापरे म्हणाल्या, “या शहरात राजमाता जिजाऊ यांचा पदस्पर्श झालेला आहे. त्यांनी दापोडीतील महादेव मंदिरात दर्शन घेतले होते. तसेच चिंचवडमधील मोरया गोसावी महाराजांच्या समाधीस्थळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची ऐतिहासिक भेट घडली होती. हे शहर म्हणजे इतिहासाच्या पावलांनी पावन झालेली भूमी आहे.”
याशिवाय, भोसरी हे प्राचीन भोजापूर नगरीचे प्रतीक असून, राजा भोज यांचा येथे संबंध असल्याचे शिलालेखातून सिद्ध होते. त्यामुळे हे शहर केवळ औद्योगिक नगरी नसून, एक ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम आहे.
महत्वाचे म्हणजे, ‘जिजाऊ नगर’ हे नाव देण्याची मागणी यापूर्वीही भक्ती शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश हिरामण बारणे, विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि हजारो नागरिकांनी केली होती. आता ही मागणी थेट विधान परिषदेत मांडली गेल्यामुळे नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या नामांतराला आता राजकीय गती मिळण्याची शक्यता असून, येणाऱ्या काळात ही मागणी प्रत्यक्षात येईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मुख्य मुद्दे:
उमा खापरे यांची विधान परिषदेत “जिजाऊ नगर” नावासाठी ठाम मागणी