पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षात नवचैतन्याचा आणि संघटनात्मक शिस्तीचा जागर सुरु आहे. शहर जिल्हा समितीच्या विविध पदांसाठी इच्छुक असलेल्या १८० हून अधिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती नुकत्याच अत्यंत शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात पार पडल्या. या मुलाखती शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.
या प्रक्रियेमध्ये जिल्हा कार्यकारिणी, विविध मोर्चा, प्रकोष्ठ, सेल अध्यक्षपदांसाठी इच्छुकांनी आपले संघटनात्मक अनुभव, सामाजिक योगदान आणि पक्षविषयक स्पष्ट विचार मांडले. महिला आणि SC/ST प्रवर्गासाठी आरक्षित पदांसह एकूण १ अध्यक्ष, ८ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, ८ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, ७ महिला पदाधिकारी, २ SC/ST पदाधिकारी आणि ६९ सदस्यांची कार्यकारिणी रचना प्रस्तावित आहे.
🔹कर्तृत्वाला न्याय – शिफारसांना नाही स्थान! शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पद ही जबाबदारी आहे. निष्ठा, कार्यक्षमता, आणि तळमळीने संघटनेत काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाईल. कोणतीही शिफारस, प्रभाव वा दबाव या प्रक्रियेत चालणार नाही. भाजपची परंपरा गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देणारी आहे.”
या पारदर्शक आणि कसोशीर मुलाखतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी आली आहे. अनेक नव्या चेहऱ्यांनी पक्षविषयक सखोल ज्ञान, भविष्यातील कार्यदृष्टी आणि सामाजिक दायित्वाबद्दल प्रभावी भूमिका मांडली.
🔸कार्यक्षम नेतृत्वाचा पाया भविष्यातील सक्षम नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही निवड प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून केवळ नवीन चेहरेच नव्हे, तर नव्या विचारसरणीचे आणि जनतेशी जवळीक साधणारे कार्यकर्ते पुढे येत आहेत. ही प्रक्रिया औपचारिकतेपुरती मर्यादित न राहता, भाजपच्या पुढील पिढीच्या नेतृत्वाची पायाभरणी ठरणार आहे.
लवकरच पदाधिकाऱ्यांची अधिकृत यादी जाहीर होणार असून भाजपच्या संघटनात्मक बळकटीकरणात ही निवड प्रक्रिया मैलाचा दगड ठरणार आहे.
भाजप पिंपरी-चिंचवड शहर समितीत १८० कार्यकर्त्यांच्या मुलाखती पूर्ण; “कर्तृत्वाला मिळणार संधी” – शत्रुघ्न काटे यांचा स्पष्ट संदेश!