Home Breaking News पंढरपूरात भाविकांची भक्ती विकली जातेय? बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाचा चंद्रभागेच्या पाण्याचा काळाबाजार उघड!

पंढरपूरात भाविकांची भक्ती विकली जातेय? बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाचा चंद्रभागेच्या पाण्याचा काळाबाजार उघड!

23
0
पंढरपूर | सोलापूर जिल्हा : वारकरी संप्रदायाची पवित्र भूमी पंढरपूर सध्या एका धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आहे. चंद्रभागा नदीचं पाणी भाविकांना “तीर्थ” म्हणून विकलं जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बीव्हीजी (BVG) कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाने पैसे घेऊन चंद्रभागेचं पाणी विकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने हा प्रकार कुठलाही खुलासा न राहता सार्वजनिक झाला आहे. या प्रकारामुळे भाविकांची श्रद्धा व भक्तीची थट्टा झाल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे. हजारो किलोमीटर प्रवास करून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना चंद्रभागेच्या पाण्याचा व्यवसाय केला जातोय, हे समजल्यावर अनेक भाविक अवाक् झाले.

सध्या चंद्रभागा नदीला पूरस्थिती असल्यामुळे महाद्वार घाटावरून नदीत उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी बीव्हीजी कंपनीकडून कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. मात्र, सुरक्षा रक्षकच भाविकांकडून पैसे घेऊन “तीर्थ” म्हणून पाणी विकत असल्याचं अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
या प्रकारामुळे मंदिर समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. खासगी सुरक्षारक्षकाच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण व्यवस्था बदनाम होत असल्याची भावनाही व्यक्त केली जात आहे. अनेक भाविकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी केलेला हा “भक्तीचा सौदा” पवित्र वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारा ठरत आहे.
राज्य शासन, मंदिर समिती आणि बीव्हीजी कंपनीने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.