मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ उडवणारी घटना विधानभवनात घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वजण एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत – “वाह रे सरकारचा न्याय?”
काल विधानभवनाच्या लॉबीमध्ये घडलेल्या प्रकारात जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे स्पष्ट व्हिडीओ फुटेजमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये मारहाण करण्याचा इशारा कोण देतंय, किती गुंड आहेत, आणि कोणाला प्रत्यक्ष मारहाण होतेय हे सर्व स्पष्टपणे दिसत असूनही आश्चर्यकारक बाब म्हणजे पोलिसांनी प्रत्यक्ष पीडित नितीन देशमुख यांनाच ताब्यात घेतले.
काय चाललंय हे सरकारमध्ये? या घटनेवर जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त होत आंदोलन पुकारलं आहे. त्यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटलं की, “जर पीडितालाच अटक केली जाते आणि गुन्हेगार मोकाट सोडले जातात, तर यात सरकारचा सहभाग शंकेच्या भोवऱ्यात येतो.” पक्षानेही स्पष्ट इशारा दिला आहे की नितीन देशमुख यांची तत्काळ मुक्तता केली नाही, तर राज्यभरात तीव्र आंदोलन उभारले जाईल.
जनतेमध्ये संतापाचा उद्रेक: सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र असंतोष आहे. ‘गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार’, ‘लोकशाहीची गळचेपी’, ‘राजकीय सूड’ अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत. लोकांना असा प्रश्न पडतो आहे की, जर विधानभवनासारख्या उच्च सुरक्षाविषयक ठिकाणीही गुंडगिरी होत असेल, तर सर्वसामान्य माणूस सुरक्षित कुठे?
सरकारची जबाबदारी: अशा परिस्थितीत सरकारने निवडक अंमलबजावणीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप होत असून, तात्काळ निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा सरकारच्या भूमिकेवर संशयाचे ढग आणखी गडद होतील.