पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल येथे नुकताच पार पडलेला पालखी सोहळा हा विद्यार्थ्यांच्या भक्तिभावाने, पारंपरिक उत्साहाने आणि संतपरंपरेच्या जागृतीने भारलेला होता. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची भव्य पालखी मिरवणूक काढली. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या गजरांनी वातावरण भक्तिरसात न्हालं.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी पालखी सजवून, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई यांच्या वेशभूषेत प्रवेश केला. शाळेच्या आवारात पालखीची मिरवणूक काढून, अध्यात्म आणि संस्कृती यांचा संगम घडवून आणला.
या सोहळ्याला नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार श्री. अमित गोरखे, कार्यकारी संचालक श्री. विलास जेऊरकर, व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तसेच तांत्रिक विभाग प्रमुख श्री. समीर जेऊरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, मूल्यशिक्षण आणि अध्यात्म यांची बीजं पेरण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले.
शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि स्थानिक नागरिकांनीही या भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेतला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. polkया पालखी सोहळ्यामुळे शाळेतील वातावरण श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक सहभागाच्या आनंदाने भरून गेलं.