सातारा शहरातील बसप्पा पेठ परिसरात मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमातून एका युवकाने शाळकरी मुलीला अडवून तिच्या गळ्यावर धारदार चाकू ठेवत “तुला ठार मारीन” अशी धमकी दिली. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसी तरुणाच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. मुलगी शाळेतून परतत असताना आरोपीने तिला बाजूला घेऊन तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. नंतर अचानक त्याने खिशातून चाकू काढून मुलीच्या गळ्यावर ठेवला आणि धमकावू लागला. या प्रसंगामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी आरडाओरडा केला, परंतु त्याच्या हातातील चाकू पाहून कोणीही लगेच पुढे सरसावले नाही.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अधिक आक्रमक झाला आणि “कोणी जवळ आलं तर हिला ठार करीन” असे म्हणू लागला. या वेळी एक धाडसी युवक जवळच्या भिंतीवरून उडी मारत आरोपीकडे दबकत गेला आणि क्षणार्धात त्याचा चाकू हिसकावून घेतला. त्याच क्षणी इतर नागरिकांनीही झडप घालून आरोपीला जमिनीवर पाडले आणि त्याच्यावर चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
या घटनेत पीडित मुलगी किरकोळ जखमी झाली असून, तिला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. आरोपीवर लवकरच गुन्हा दाखल होणार आहे. त्याचे वय लक्षात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिली.
या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित शाळेचे संस्थापक आणि शिक्षकांनीही तात्काळ पोलीस ठाणे गाठले. शहरातील नागरिकांनी पोलिसांची तत्काळ मदत मागवत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.