प्रतिनिधी : श्रावणी कामत | पिंपरी, पुणे | पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! बाणेर आणि अहिल्यानगर, पुणे येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांना ब्रिटिश पार्लमेंट, लंडन येथे “एक्सलेंस अवॉर्ड” देऊन भव्य सन्मान करण्यात आला.
लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भव्य सोहळा
लंडन ऑर्गनायझेशन ऑफ स्किल्स डेव्हलपमेंट या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांतील जागतिक स्तरावरील कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा हाऊस ऑफ कॉमन्स, ब्रिटिश पार्लमेंट येथे पार पडला.
या वेळी पुरस्कार डॉ. हरके यांना सीईओ डॉ. परिन सोमाणी, खासदार बॉब ब्लॅकमन आणि गाम्बियाचे राजकुमार महामहिम इब्राहिम सान्यांग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
१८३ विश्वविक्रमांचे धनी – एकमेव भारतीय
डॉ. हरके हे १८३ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय आहेत. भारताच्या प्राचीन राजयोग आणि ध्यानधारणेचा जागतिक स्तरावर प्रसार हे त्यांचे आयुष्यध्येय असून त्यांनी या माध्यमातून भारताचा झेंडा अनेक देशांत फडकवला आहे.
आंतरराष्ट्रीय गौरवांची मालिका
ब्रिटनमध्ये ८ पुरस्कार, त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विशेष सन्मान
दुबईमध्ये ५ पुरस्कार, बँकॉकमध्ये ३, नेपाळमध्ये २, तसेच रशिया, स्वित्झर्लंड, मलेशिया आणि श्रीलंका येथेही पुरस्कार
फोर्ब्स मासिकाने २०२० मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेतली
संपूर्ण जीवन ध्यानधारणेला समर्पित
महाविद्यालयीन काळातच ब्रह्माकुमारी संस्थेशी जोडले गेलेले डॉ. हरके यांनी नंतर आपले संपूर्ण जीवन राजयोग ध्यानधारणेच्या प्रचारासाठी अर्पण केले आहे. ते जगभरात प्रवास करून सकारात्मक जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि शांततेचा संदेश पोहोचवत आहेत.
बाणेर आणि अहिल्यानगरमध्ये आनंदाचा उत्सव
ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेल्या या ऐतिहासिक गौरवामुळे बाणेर, पुणे आणि अहिल्यानगर येथील ब्रह्माकुमारी केंद्रांमध्ये आनंदसोहळा आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. हरके यांचा सन्मान म्हणजे भारतीय संस्कृती, ध्यानधारणा आणि सकारात्मक मूल्यांचा जागतिक स्वीकार आहे.