कोंढवा, पुणे – एका २२ वर्षीय आयटी क्षेत्रात कार्यरत तरुणीनं केलेल्या खोट्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीने पुणे शहरात मोठी खळबळ उडवली होती. मात्र पोलिसांच्या कसोशीच्या तपासानंतर सत्य बाहेर आले असून, संबंधित तक्रार खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आता तक्रार करणाऱ्या तरुणीविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ जुलै रोजी एका डिलिव्हरी बॉयने जबरदस्तीने फ्लॅटमध्ये घुसून अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला होता. एवढंच नव्हे, तर त्या तरुणाने स्प्रे मारून बेशुद्ध केल्याचा आणि तिच्यासोबत सेल्फी काढून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला होता. या गंभीर तक्रारीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात खळबळजनक माहिती समोर आली – आरोपी तरुण हा तक्रारदार महिलेचा मित्रच होता आणि तो तिच्या संमतीने फ्लॅटमध्ये गेला होता. फ्लॅटमध्ये जबरदस्तीचा किंवा कोणताही अत्याचाराचा प्रकार घडल्याचा पुरावा पोलिसांना आढळून आला नाही.
फोनवरील चॅट, कॉल रेकॉर्ड्स आणि महिलेच्या वर्तनावरून हे स्पष्ट झालं की तिने पोलीस आणि न्यायव्यवस्थेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या खोट्या तक्रारीमुळे पोलिसांनी बीएनएस कलम २१२, २१७ आणि २२८ अंतर्गत तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत – खोट्या तक्रारीमुळे निरपराध व्यक्तीवर गुन्हा लागण्याचा धोका, पोलिसांची वेळ आणि संसाधनांचा अपव्यय, आणि महत्त्वाचे म्हणजे खऱ्या पीडित महिलांवरील विश्वासाला तडा जाण्याची शक्यता.
🔹 समाजात संदेश: खोट्या तक्रारींमुळे न्यायसंस्थेवरचा विश्वास ढासळतो. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून खरं गुन्हेगार पकडले जातील आणि खोट्यांना रोखता येईल.