रायगड | मावळ तालुका | विशेष प्रतिनिधी:- दरवर्षी प्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडवर शिवप्रेमी, भक्तगण, आणि वारकरी भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने उजळलेला शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. यावर्षी या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे ह.भ.प. श्रीमंत रमेश जी व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित भव्य वारकरी दिंडी.
वारकरी आणि धारकरी संस्कृतीचा संगम – काळाची गरज
या भव्य आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे केवळ भक्तीचे प्रदर्शन नव्हे, तर धारकरी संस्कृतीची प्रेरणाही तरुणांना देणे. ह.भ.प. श्रीमंत रमेश जी व्यास यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे – “ज्याचे शास्त्र प्रगत, ज्याचे शस्त्र प्रगत – त्याचेच राष्ट्र प्रगत!” त्यामुळे भक्ती आणि शक्तीचा समन्वय साधत नव्या पिढीला शूरवीरांचा इतिहास आणि आदर्श शिकवणे हे या दिंडीचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी इतिहासाचे सत्र
या कार्यक्रमात वारकरी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यासारख्या थोरवीरांचे शौर्यकथन, व्याख्याने आणि शौर्यगीतांच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शाळा-कॉलेजमधून सुद्धा ह.भ.प. रमेश व्यास यांनी आधीपासूनच अनेक ठिकाणी प्रबोधनपर व्याख्याने घेतली आहेत, त्यामुळे अनेक युवक त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन चांगला सत्संग, शिस्त आणि राष्ट्रसेवा याकडे वळले आहेत.
बालवयात संस्कार – उज्ज्वल राष्ट्राचा पाया
त्यांचा कटाक्ष आहे की, बालमनावर योग्य संस्कार रुजवले गेले, तर राष्ट्र घडण्याच्या प्रक्रियेत मूलभूत परिवर्तन होऊ शकते. ह.भ.प. रमेश व्यास यांना या कार्यात छत्रपती संभाजी महाराजांची आदर्श प्रेरणा लाभलेली आहे आणि ते त्यांच्या कार्यात मित्रत्व भावनेने सहकार्य करत आहेत.
मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे सहकार्य
या भव्य दिंडीचे आयोजन मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आणि समितीचे कोअर कमिटीचे सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. कार्यक्रमात ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे, ह.भ.प. रामदास महाराज पडवळ, ह.भ.प. सुभाष महाराज पडवळ यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. भाविक भक्त मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत आहेत.
ह.भ.प. रमेश जी व्यास यांचे प्रेरणादायी वाक्य
“भक्ती-शक्ती असे ज्याचे ठायी, त्याला जीवनी काहीच कमी नाही!” असे ह.भ.प. श्रीमंत रमेश जी व्यास नेहमीच आवर्जून सांगत असतात.