Home Breaking News भुशी धरणातील बुडालेल्या पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात ‘शिवदुर्ग मित्र’च्या पथकाला यश – दोघेही...

भुशी धरणातील बुडालेल्या पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात ‘शिवदुर्ग मित्र’च्या पथकाला यश – दोघेही तरुण उत्तर प्रदेशचे

73
0
लोणावळा | प्रतिनिधी :- लोणावळ्याच्या प्रसिद्ध भुशी धरणात वर्षाविहारासाठी आलेल्या दोन तरुण पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (८ जून) दुपारच्या सुमारास घडली. धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या मोहम्मद जमाल आणि साहिल शेख या दोघांचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी असून, त्यांच्या मृतदेहांचा शोध घेण्यात शिवदुर्ग मित्र मंडळाच्या बचाव पथकाने मोलाची भूमिका बजावली.
घटनास्थळावर थरकाप, बंदी असलेल्या ठिकाणीच केला प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे युवक आ जणांच्या सहकाऱ्यांसह पुण्यातील थेरगाव येथून वर्षाविहारासाठी लोणावळ्यात आले होते. पर्यटकांना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात प्रवेश करण्यास बंदी असूनही, ही मंडळी बेकायदेशीरपणे पाण्यात उतरली. धरणाचा परिसर अतिशय धोकेदायक असून पूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. प्रशासनाच्या सततच्या इशाऱ्यांनंतरही पर्यटकांचा निष्काळजीपणा या दुर्घटनेला कारणीभूत ठरतो.
 घटनास्थळी तातडीने पोलीस, स्वयंसेवक दाखल
घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस, शिवदुर्ग मित्र आपत्कालीन बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महेश म्हसणे, सचिन गायकवाड, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू, हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, श्याम वाल्मीक, महादेव भवर, राजेंद्र कडू, अनिल आंद्रे, सागर कुंभार, सागर दळवी आदींनी जलद प्रतिसाद देत शोध मोहिम राबवली. फक्त अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांत मृतदेह सापडले आणि पोलीसांकडे सोपवण्यात आले.
 स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया
या दुर्घटनांनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “भुशी धरणाजवळ सुरक्षारक्षकांची नेमणूक, चेतावणी फलकांची संख्या वाढवणे आणि बंदी असलेल्या क्षेत्रात पोलीस गस्त वाढवणे गरजेचे आहे,” असा सूर उपस्थित राहिला.
 मृतांप्रती श्रद्धांजली आणि सावधगिरीचा संदेश
दोन्ही मृत युवक मूळ उत्तर प्रदेशातील मिरजापूर येथील रहिवासी असून, पुण्यात नोकरीनिमित्त राहत होते. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. ही दुर्घटना पुन्हा एकदा आठवण करून देते की, प्रकृती सौंदर्य अनुभवताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे. निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो.