Home Breaking News पिंपरी कॅम्पमध्ये रस्ते रुंदीकरणास व्यापाऱ्यांचा कडाडून विरोध; श्रीचंद आसवानी यांनी मनपाला दिले...

पिंपरी कॅम्पमध्ये रस्ते रुंदीकरणास व्यापाऱ्यांचा कडाडून विरोध; श्रीचंद आसवानी यांनी मनपाला दिले पत्र

30
0
पिंपरी-चिंचवड | 27 जून 2025 :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्याविरोधात पिंपरी कॅम्प परिसरातील व्यापाऱ्यांनी जोरदार हरकत नोंदवली आहे. पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी महानगरपालिका प्रशासनाला लेखी पत्राद्वारे ही हरकत दाखल केली असून, कॅम्प परिसरातील व्यापारी आणि रहिवासी यांच्यावर हा आराखडा अन्यायकारक ठरेल, असे ते म्हणाले.
श्रीचंद आसवानी यांनी स्पष्ट केले की, “१९४७ पासून येथे स्थायिक झालेल्या सिंधी समाजासह अन्य व्यापाऱ्यांच्या व्यवसायांना आणि वास्तव्याला या आराखड्यामुळे धोका निर्माण झाला आहे. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात येणार असून, लोकांना त्यांच्या मुळव्यवसायातून विस्थापित व्हावे लागेल.”

व्यापाऱ्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे:
पिंपरी कॅम्प परिसराला “गावठाण” म्हणून घोषित करावे, व त्यानुसार सेवा-सुविधा द्याव्यात.
खालील रस्ते सद्यस्थितीतच राखून ठेवावेत, रचनेत कोणताही बदल करू नये:
साई चौक ते लालबहादूर शास्त्री उद्यान
रेल्वे स्टेशन ते किंमतराम आसवाणी अंडरपास
अशोक थिएटर ते तपोवन मंदिर रस्ता
रिव्हर रोड ते मिलिंद नगर
डीलक्स थिएटर रस्ता ते नऊ मीटर रस्ता
रवी सोसायटी ते अशोक थिएटर
या रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यास स्थानिक व्यावसायिकांचे दुकानांचे बांधकाम, घरांचे आस्तित्व संपुष्टात येईल. यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
 व्यापारी प्रतिनिधींची उपस्थिती:
सुरेश शर्मा, जगदीश आसवानी, आकाश बजाज, सावल तोताणी, नीरज चावला, रमेश जधवाणी, दीपक सोनाजी, अर्जुन मेलवाणी, जयराम नागदेव, सुनील हिंगोराणी, रवी गोरवाणी, अवि तेजवाणी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. आसवानी म्हणाले, “हा आराखडा राबवण्याआधी स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा व्हायला हवी होती. रोजीरोटीचा मुद्दा बाजूला ठेवून विकास आराखडा लादणे म्हणजे लोकशाहीला फाटा देण्यासारखे आहे. आम्ही विकासाला विरोध करत नाही, परंतु विकासाच्या नावाखाली विस्थापन नको.”
 व्यापाऱ्यांचा इशारा:
जर महानगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.