Home Breaking News डिजिटल पत्रकारांचा आवाज बुलंद! राज्यव्यापी डिजिटल मिडिया मेळाव्याची लवकरच घोषणा – एस.एम....

डिजिटल पत्रकारांचा आवाज बुलंद! राज्यव्यापी डिजिटल मिडिया मेळाव्याची लवकरच घोषणा – एस.एम. देशमुख यांची कोल्हापुरात माहिती

108
0
प्रतिनिधी – श्रावणी कामत | कोल्हापूर – महाराष्ट्रातील डिजिटल पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांना शासन दरबारी आवाज मिळवून देण्यासाठी ‘डिजिटल मिडिया परिषद’ लवकरच राज्यस्तरीय मेळावा आयोजित करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी काल कोल्हापुरात केली.
मेळाव्याचे आयोजन पुणे किंवा संभाजीनगर येथे होणार असून, राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये परिषदेचा प्रभाव वाढला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्येही शाखा स्थापन होताच, हा राज्यस्तरीय उपक्रम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर-सांगलीतील पत्रकारांचा मेळावा आणि ओळखपत्र वितरण कार्यक्रम
डिजिटल मिडिया परिषदेच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी विशेष मेळावा आणि ओळखपत्र वितरण समारंभ पार पडला. या वेळी शेकडो पत्रकारांनी उपस्थिती लावली. पत्रकारांना मार्गदर्शन करताना देशमुख म्हणाले –  “डिजिटल मिडियाला सरकारने जाहीरात देण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्यात युट्यूब चॅनल्स आणि न्यूज पोर्टल्सचा उल्लेख नाही. ही गंभीर बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत.”
 डिजिटल पत्रकारांसाठी विभागवार तांत्रिक कार्यशाळा
डिजिटल माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकारांना तांत्रिक ज्ञान, कायदे व धोरणे यांची माहिती देण्यासाठी लवकरच विभागवार कार्यशाळा आयोजित केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. “अधिस्वीकृती, सरकारी मान्यता, जाहिराती मिळवणं या बाबींसाठी परिषद शासनाकडे सतत पाठपुरावा करत आहे,” अशीही ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मंचावर उपस्थित मान्यवर:
विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे , कार्याध्यक्ष शिवराज काटकर, अधिस्वीकृती समिती सदस्य जान्हवी पाटील, मुंबई विभाग अध्यक्ष दीपक कैतके, पुणे विभाग अध्यक्ष हरीष पाटणे, लातूर विभाग अध्यक्ष विजय जोशी, कोल्हापूर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गणपत शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन अभिजित पटवा यांनी केले, तर अनिल धुतमाळ यांनी मतप्रदर्शन केले.
 पत्रकारांची मौलिक मते आणि सूचना महत्त्वाची!
या वेळी उपस्थित पत्रकारांनी डिजिटल पत्रकारितेतील अडचणी, महसूलवाढीच्या संधी आणि कायदेशीर सन्मान या बाबत मौलिक सूचना केल्या. “डिजिटल पत्रकारिता ही भविष्यातील दिशा असून तिचा सन्मान राखण्यासाठी एकजूट गरजेची आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.
 ओळखपत्रांचे वितरण
कार्यक्रमात डिजिटल पत्रकारांना ओळखपत्रांचे वितरण एस.एम. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, ज्यामुळे अनेक पत्रकारांना अधिकृतता आणि ओळखीचा सन्मान लाभला.