अहमदाबाद | प्रतिनिधी :- गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एक भीषण विमान अपघात घडला असून यात एअर इंडिया फ्लाइट AI-171 चा बोईंग 787-8 ड्रीमलाइनर लंडनच्या गॅटविक विमानतळावर जात असताना उड्डाण घेतल्यानंतर मेघाणीनगर परिसरात कोसळला. या अपघातामुळे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोककळा पसरली आहे.
विमानात 242 जण; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
या विमानात एकूण 242 प्रवासी व चालक दलाचे सदस्य होते. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार प्रवाशांचे देशवार तपशील असे आहेत:
169 भारतीय नागरिक
53 ब्रिटिश नागरिक
7 पोर्तुगीज नागरिक
1 कॅनडियन नागरिक
12 क्रू मेंबर्स
ही माहिती समोर आल्यानंतर भारतासह युरोपमधील नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांनी विमानतळावर गर्दी केली असून आकुलतेने माहितीची वाट पाहत आहेत.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
विमान अपघातानंतर एनडीआरएफच्या (NDRF) सहा तुकड्या, अग्निशमन दलाच्या १४ गाड्या आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. घटनास्थळी प्रचंड आग लागली होती, जी आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना ग्रीन कॉरिडोरद्वारे तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत आहे.
सरकारचा तातडीचा प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची गांभीर्याने दखल घेतली असून नागरिक उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्याशी चर्चा केली. गृहमंत्री अमित शाह हे स्वतः अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.
ब्रिटन, कॅनडा आणि पोर्तुगाल सरकारनेही भारत सरकारकडून अधिकृत माहिती मागवली आहे. त्यामुळे हा अपघात केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आपत्ती ठरत आहे.
अपघाताचे कारण अद्याप गुलदस्त्यात
विमानाच्या पायलटनं उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच ‘MAYDAY’ कॉल दिला होता. हा कॉल संकटाची जाणीव देणारा असतो. यानंतर काही क्षणातच विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि विमान कोसळले.
जनतेतून शोक व्यक्त
या भीषण दुर्घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली वाहत, जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.