Home Breaking News वैजनाथ विकास आराखड्यास गती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक,...

वैजनाथ विकास आराखड्यास गती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक, २८६ कोटींच्या कामांचा दर्जा व श्रद्धेचा समतोल साधण्याचे निर्देश

114
0

परळी, बीड | परळीतील श्री वैजनाथ मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेचा आढावा आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रांतीगृहात घेण्यात आला. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, तसेच विविध शासकीय अधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले की, “वैजनाथ हे महाराष्ट्रातील एक पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. येथे लाखो भाविक वर्षभर दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे सुरू असलेल्या सर्व विकासकामांचा दर्जा अत्यंत उच्च असला पाहिजे. भाविकांना आधुनिक सुविधा तर मिळाव्यातच, पण या मंदिराच्या प्राचीन, पुरातन महत्त्वाला कोणतीही बाधा होऊ नये, याची विशेष काळजी घेतली पाहिजे.”

 133 कोटींपासून 286 कोटींपर्यंत निधीचा वाढता टप्पा

योजना सुरु करताना 133 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना या योजनेला गती दिली होती. पुढे जाऊन ही रक्कम वाढवून 286 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या निधीतून मंदिर परिसरातील विविध अत्याधुनिक सुविधा, भाविकांसाठी भक्त निवास, दर्शन मंडप, पार्किंग व्यवस्था, रोड डेव्हलपमेंट, तसेच प्रसादालय, सुलभ शौचालय व्यवस्था, सजावट व प्रकाशयोजना या गोष्टींचा समावेश आहे.

पौराणिक महत्त्व टिकवून ठेऊन विकास

अजित पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “वैजनाथ मंदिर हे धार्मिक भावनांचे प्रतीक आहे. येथे कोणतेही विकास काम करताना मंदिराच्या पौराणिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला बाधा पोहोचू नये. वास्तूशास्त्र आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखालीच कामे व्हावीत.”

 मंत्री धनंजय मुंडे यांचे वक्तव्य

मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, “वैजनाथ मंदिराचे महत्व हे केवळ बीड जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धेचे हे केंद्र आहे. अजित पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेतून भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जातील.”

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची माहिती

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, “286 कोटींच्या या योजनेतील अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित कामांना देखील गती देण्यात येत आहे. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, यासाठी कठोर नियंत्रण ठेवले जात आहे.” भाविकांसाठी दर्जेदार सोयीसुविधा

• भक्त निवास – एकाच वेळी हजारो भाविक थांबू शकतील अशी व्यवस्था
• दर्शन मंडप – जलद आणि सुलभ दर्शनासाठी नियोजन
• प्रसाद केंद्र – स्वच्छता आणि गुणवत्तेसह प्रसाद वितरण
• वाहतूक व पार्किंग – भाविकांच्या वाहनांसाठी नियोजित व सुरक्षित पार्किंग
• सौंदर्यीकरण – मंदीर परिसरात हरित पट्टा, आकर्षक फुलबागा, प्रकाशयोजना