Home Breaking News 150 दिवसांचा सुधारणा आराखडा जाहीर; 2 ऑक्टोबरला निकाल घोषित होणार – मुख्यमंत्री...

150 दिवसांचा सुधारणा आराखडा जाहीर; 2 ऑक्टोबरला निकाल घोषित होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा”

92
0

मुंबई :– महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्यांनी मंत्रालयात ‘१०० दिवस कार्यालयीन सुधारणा’ या उपक्रमाचा यशस्वी पहिला टप्पा पूर्ण केल्याची माहिती दिली. आता याच प्रेरणेतून पुढील १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे, ज्याचा निकाल २ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केला जाईल.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रशासनातील लोकाभिमुखता, कामकाजातील सुलभता आणि जबाबदारी यांचे मूळ घटक बळकट करणे आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “विकसित भारत २०४७” च्या धर्तीवर ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे डॉक्युमेंट महाराष्ट्राच्या भविष्याचे आराखडे ठरवणारे ठरेल. कृषी, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, तंत्रज्ञान, मानव संसाधन, पायाभूत सुविधा अशा १६ विभागांचा यात समावेश असून, २०२९, २०३५ आणि २०४७ या टप्प्यांत ही उद्दिष्टे पूर्ण करण्याचा संकल्प केला जाईल.

Ease of Living, Ease of Doing Business, आणि G2G – Ease of Working या तत्त्वांवर आधारित सुधारणा या १५० दिवसांत राबवण्यात येणार आहेत. शासकीय सेवा आणि नागरी सुविधा अधिक सुलभ होणार असून, केंद्र-राज्य समन्वयही या माध्यमातून बळकट केला जाईल.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला उद्देशून सांगितले की, “शासन आणि प्रशासन हे रथाची दोन चाके असून, दोघांनी समन्वयाने गतीने कार्य केले तरच जनतेपर्यंत सेवेचा फायदा पोहचेल.” ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे उदाहरण देत, नागरिकांना त्यांच्या गावीच सेवा मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात शंभर दिवसांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विभाग, अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. विविध शासकीय विभागांनी आपली उत्तरपत्रिका स्वतः तयार करून स्वतःच त्यावर काम करत विश्वासार्ह आणि पारदर्शक पद्धतीने आपली प्रगती सादर केली.

महत्वाचे गौरवप्राप्त अधिकारी व विभाग:

  • महिला व बालविकास विभाग – अदिती तटकरे, अनुप यादव

  • सार्वजनिक बांधकाम – शिवेंद्रसिंह राजे भोसले, मनीषा म्हैसकर

  • ग्रामविकास – जयकुमार गोरे, एकनाथ डवले

  • कृषी विभाग – विकासचंद्र रस्तोगी

  • पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त – शेखर सिंह

  • उल्हासनगर महापालिका आयुक्त – मनीषा आव्हाळे

  • सर्वोत्तम पोलीस अधिकारी – बाळासाहेब पाटील (पालघर), निलोत्पल (गडचिरोली)

कार्यक्रमाची सुरुवात करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन केले. “भारत आता सहन करणार नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे”, असे ठाम विधान त्यांनी केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नवा आदर्श घालून दिला जात आहे, जो इतर राज्यांसाठीही प्रेरणादायक ठरेल. प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व, व लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम ऐतिहासिक ठरेल यात शंका नाही.