मुंबई, १२ मे: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत लोकल ट्रेन ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. मात्र, याच लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतोय, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. कल्याणहून सुटणारी महिलांसाठी खास ‘लेडीज स्पेशल’ लोकल ४० मिनिटं उशिराने आल्याने ट्रेनमध्ये अफाट गर्दी झाली आणि अनेक महिलांना पायऱ्यांवर लटकत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सकाळच्या गर्दीच्या वेळी लटकत प्रवास
सोमवारी सकाळच्या पीक अवरमध्ये ही घटना घडली. कल्याण स्थानकातून सुटणारी महिलांची लोकल ४० मिनिटं विलंबाने आली. त्यामुळे आधीच ऑफिसला जाणाऱ्या महिलांची मोठी गर्दी झाली होती. ट्रेन आल्यानंतर महिलांनी कुठल्याही परिस्थितीत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही महिलांनी पायऱ्यांवर उभं राहत किंवा दरवाजाच्या कडेला लटकून प्रवास केला. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यावर प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष?
@MumbaiRailUsers या ट्विटर/X हँडलवरून शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला अक्षरशः रेल्वेच्या दाराला लटकलेली दिसत आहे. हे दृश्य काळजाचा ठोका चुकवणारं आहे. अनेक प्रवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सतत होणाऱ्या उशिरामुळे त्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, असं म्हटलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून सतत “दरवाजावर उभं राहणं धोकादायक आहे” असे इशारे दिले जातात, पण जेव्हा वेळेवर ट्रेनच मिळत नाही, तेव्हा पर्यायच उरत नाही, असं महिलांचं म्हणणं आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली दखल
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेचे अधिकृत ट्विटर/X हँडल @DrmMumbaiCR आणि रेल्वे सुरक्षा दल @RPFCR यांना टॅग करत तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, ही चौकशी पुरेशी ठरणार का, असा प्रश्न प्रवाशांमध्ये आहे.
प्रवाशांचा हक्क आहे सुरक्षित प्रवास
या घटनेमुळे मुंबईतील महिलांना दररोज सामोरे जावे लागणारे खडतर वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे. वेळेवर ट्रेन न मिळणं, अपुरी सेवा, आणि अमानवी गर्दी यामुळे महिला प्रवासी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. सुरक्षित आणि वेळेवर प्रवास करण्याचा हक्क त्यांना मिळणार की नाही, हा प्रश्न या घटनेनंतर गडद झाला आहे.