Home Breaking News रोज १०० डॉलर परताव्याचे अमिष दाखवून ९६ लाखांची फसवणूक; रावेतमध्ये धक्कादायक प्रकार...

रोज १०० डॉलर परताव्याचे अमिष दाखवून ९६ लाखांची फसवणूक; रावेतमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

95
0

रावेत परिसरात बीटीसी (Bitcoin) आणि युएसडीटी (USDT) ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज १०० डॉलर परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तब्बल ९६ लाख ९३ हजार २८९ रुपयांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रावेत येथील डॉ. डी. वाय. पाटील रोडवरील रॉयल कासा सोसायटीत राहणाऱ्या एका नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२६) तक्रार दाखल केली आहे.

ही घटना १५ जुलै २०२४ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत घडली. अज्ञात आरोपीने फिर्यादीशी संपर्क साधून “बीटीसी आणि युएसडीटी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज १०० डॉलर परतावा मिळेल” असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच, नफ्यातून २० टक्के रक्कम कमिशन म्हणून ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल, अशी अटही घातली.

फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले गेले. विश्वासात घेऊन, गुंतवणूक वाढविण्याच्या नावे, एकूण ९६ लाख ९३ हजार २८९ रुपये उकळण्यात आले. मात्र, अपेक्षित परतावा मिळालाच नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने थेट सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

सायबर पोलीसांनी तात्काळ तपास सुरु केला असून एका मोबाईल धारक आणि बँक खातेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या प्रकरणात आणखी कोणी फसवणुकीचा बळी पडला आहे का, याचाही सखोल तपास केला जात आहे.

अशा प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नये, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यवहारापूर्वी खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सध्या रावेतसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.