Home Breaking News पुण्यात मोठा QR कोड घोटाळा! हॉटेल मॅनेजरने ग्राहकांचे ₹31.62 लाख स्वतःच्या खात्यात...

पुण्यात मोठा QR कोड घोटाळा! हॉटेल मॅनेजरने ग्राहकांचे ₹31.62 लाख स्वतःच्या खात्यात वळवले; पाच वर्षांचा आर्थिक गैरव्यवहार उघड

101
0

पुणे – डिजिटल व्यवहाराच्या युगात घडलेल्या एका धक्कादायक फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. एरंडवणेतील कटा किर्र हॉटेलमधील मॅनेजर अमोल अर्जुन भुसाळे याने तब्बल ₹31.62 लाख इतकी रक्कम QR कोडच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक खात्यात वळवली असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

फसवणुकीप्रकरणी हॉटेल मालक विजय प्रभाकर अवटी (राहणार करिश्मा सोसायटी, कोथरूड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भुसाळे हा जनवारी २०१९ ते १६ जून २०२४ दरम्यान कॅश काउंटरवर मॅनेजर म्हणून कार्यरत होता.

फसवणूक कशी उघडकीस आली?

भुसाळे हॉटेलमध्ये काम करत असताना ग्राहकांना अन्नाच्या टोकन देताना अधिकृत बिलिंग प्रक्रियेचा फसवाच करत होता. काही ग्राहकांना रोख अथवा QR कोडद्वारे पैसे भरण्यास सांगताना, तो हॉटेलचा अधिकृत QR कोड न वापरता स्वतःच्या वैयक्तिक खात्याशी संलग्न QR कोड वापरत असे.

याचप्रमाणे, पार्सल ऑर्डर आणि डायनिंग बिलांचे पैसेही तो आपल्या खात्यात वळवत असे. हे सगळे व्यवहार त्याने पाच वर्षांच्या कालावधीत केले असून, एकूण ₹31,62,126 इतकी रक्कम त्याने ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे गुपचूप हडप केली.

ग्राहकाच्या एका फोनने फोडला घोटाळा

या फसवणुकीचा उलगडा तेव्हाच झाला, जेव्हा भुसाळेने नोकरी सोडून स्वतःचे हॉटेल सुरू केले. अलीकडेच एका ग्राहकाने अवटी यांना फोन करून “मिश्र पार्सलसाठी पैसे भुसाळे यांच्या नंबरवर ट्रान्सफर केल्याचे” सांगितले. यामुळे अवटी यांना शंका आली आणि त्यांनी तत्काळ हॉटेलची अंतर्गत चौकशी सुरू केली.

चौकशीत, ज्यांना टोकन देण्यात आले आणि ज्यांच्याकडून पैसे जमा झाले, त्यामध्ये मोठा फरक दिसून आला. पुढील तपासात भुसाळेने हॉटेलच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केल्याचे सिद्ध झाले.

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या गंभीर प्रकारानंतर डेक्कन पोलीस ठाण्यात अमोल भुसाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत या प्रकरणाचा तपास करत असून, अधिक माहिती मिळवण्यासाठी आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी सुरू आहे.

हॉटेल व्यवसायिकांसाठी धोक्याचा इशारा!

हा प्रकार हॉटेल क्षेत्रात डिजिटल व्यवहार करताना होणाऱ्या संभाव्य फसवणुकीबाबत मोठा धडा आहे. QR कोडचा चुकीचा वापर करून केलेल्या अशा फसवणुकीमुळे, अनेक व्यावसायिकांनी आता ऑनलाईन व्यवहारांची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची गरज आहे.