पुणे – शहरात पुन्हा एकदा मानवी संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाषाण सर्कल परिसरात रात्री उशिरा एका विवाहित जोडप्यावर सहाजणांच्या टोळीने भयंकर हल्ला केला. केवळ हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून झालेल्या या रोडरेज प्रकरणाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असून, सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पीडित अमलदेव पी. व्ही. के. रमन आणि त्यांची पत्नी केतकी भुजबळ हे 18 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता मित्रांसोबत जेवण करून मुकुंदनगरहून घरी परतत होते. पाषाण सर्कलजवळील रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारचा पाठलाग केला. हे दोघं ॲक्टिवा स्कूटरवर होते व अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. अमलदेव यांनी हॉर्न वाजविल्यावर त्या व्यक्तींपैकी एकाने संतापून कारच्या काचांवर ठोसे मारायला सुरुवात केली आणि २० मीटरपर्यंत कारचा रस्ता अडवून ठेवला.
यानंतर परिस्थिती बिघडतच गेली. आणखी चार जण घटनास्थळी आले आणि अमलदेव यांच्यावर दगड व लाकडाने जबर मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा नाक फोडला गेला, कानाला इजा झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान, केतकी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आला. त्यांना पोटावर जबर मार लागून आतून दुखापत झाली आहे, ज्याचे सोनोग्राफी अहवालाद्वारे निदान झाले आहे.
या हिंसक टोळीने त्यांच्या कारचेही मोठे नुकसान केले – काचा फोडल्या, हेडलाईट्स तोडले आणि मोठा दगड आत फेकून दिला, ज्यामुळे दोघांनाही गंभीर इजा झाली.
“आम्ही कसाबसा पळून गेलो, पण अमल रक्ताने माखलेले होते. आम्ही लगेच माझ्या भावाकडे गेलो, ज्यांनी आम्हाला पोलीस स्टेशन व नंतर औंध येथील साईश्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलं,” असं केतकी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं आहे. ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सर्वात त्रासदायक बाब म्हणजे या घटनेदरम्यान बघ्यांनी फक्त मोबाईलवर व्हिडीओ घेतले, पण कोणी मदतीला आले नाही. “कोणी मदतीला नाही आलं… लोकं फक्त बघत राहिले. तेच सर्वात जास्त वेदनादायक आहे,” असं केतकी यांनी सांगितलं.
चतुरश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी भा.न्या.सं. 118(1), 126(2), 115(2), 352, 324(4), आणि 3(5) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले असून, महाराष्ट्र पोलीस कायद्याचेही कलमं लावण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्याचे व त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मानसिकदृष्ट्या हादरलेली केतकी पुढे म्हणाल्या, “मी पूर्वी खूप बिनधास्त आणि स्पष्टवक्ती मुलगी होते. आता दारं शंभर वेळा तपासते. घराबाहेर पडायलाही भीती वाटते. हे सगळं एक दुःस्वप्न वाटतं आहे.”
ही घटना केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण पुणेकरांवर मानसिक आघात करणारी आहे. शहराच्या रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांची तत्काळ कारवाई आणि दोषींवर कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.