सांगली : सांगली शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्षता घेतली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
गुन्हेगारी घटनेचा वाढता आलेख पाहता सांगलीत “क्राईम टास्क फोर्स” ची स्थापना करण्यात आली आहे. या टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. त्यांनी जिल्हाधिकारी यांना “शस्त्र परवान्यांचा आढावा घेण्याच्या” सूचना दिल्या.
शस्त्र परवान्यांवर विशेष लक्ष केंद्रित
पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील शस्त्र परवाने तपासणी करून मयत व्यक्तींचे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांचे परवाने तात्काळ रद्द करावेत.” अशा व्यक्तींना शस्त्र परवाने दिल्यास समाजात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रक्रियेत अधिक दक्षता बाळगावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका हद्दीत चौक्यांची उभारणी
गुन्हेगारी रोखण्यासाठी सांगली महानगरपालिका हद्दीत “छोट्या चौक्या” उभारण्यात याव्यात, जेणेकरून स्थानिक पोलिसांना वेळेवर गुन्हेगारी घटनांवर कारवाई करता येईल, असेही पालकमंत्र्यांनी सुचवले.
सायबर क्राइम आणि विशेष पथकांना बळकटी
पालकमंत्री पाटील यांनी पुढे सांगितले की, सायबर क्राइम शाखा, दामिनी पथक, निर्भया पथक यांना अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल. तसेच, आगामी आर्थिक वर्षात महाविद्यालयांमध्ये गस्तीसाठी महिला पोलिसांना दुचाकी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुन्हे अन्वेषणासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणे उपलब्ध करण्यावरही भर दिला जाणार आहे.
बैठकीस मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक विमला एम., मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा हे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील अन्य उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.