राजकीय नेत्यांचा एकमताने निर्णय, नव्या चेहऱ्यांच्या संधीवर उत्सुकता
मावळ आणि मुळशी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला बिनविरोध स्वरूप देण्याचा सर्वपक्षीय नेत्यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाला सहमती, मात्र संचालक मंडळात बदलाचे संकेत
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडेल, यावर सर्वपक्षीय मोहर लागली आहे. मात्र, संचालक मंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, या मागणीमुळे काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान संचालकांपैकी काहींना माघार घ्यावी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांनी उमेदवारी अर्ज भरून नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले असल्याचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुनील शेळके यांनी हा गैरसमज दूर करत स्पष्ट केलं की, “नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाचा आम्हाला पूर्ण आदर आहे. फक्त नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी, अशी सर्वसामान्य सभासदांची इच्छा आहे.”
१९५ अर्ज दाखल, मात्र बिनविरोध निवडणुकीवर एकमत!
या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी विक्रमी १९५ अर्ज दाखल झाले होते, त्यामुळे नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, पक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर हा तणाव कमी झाला आणि निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला गेला.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक!
या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस अजित पवार यांच्या वतीने निरीक्षक सुरेश घुले, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, माजी मंत्री बाळा भेगडे, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे उपस्थित होते.
२५ मार्चपूर्वी अर्ज माघारीची अंतिम मुदत!
सर्व उमेदवारांनी २५ मार्चपर्यंत अर्ज माघारी घेण्याचे निर्देश दिले असून, ते शक्य झाल्यास नानासाहेब नवले पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होतील. तसेच, संचालक मंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
बापूसाहेब भेगडे यांच्या राजकीय भूमिकेची चर्चा!
कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी मागील विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे कशी राहतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारखान्याचा प्रगतीशील इतिहास – सहकाराच्या क्षेत्रात नवले यांचे नेतृत्व ठळक!
नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम साखर कारखान्याने मोठी प्रगती केली आहे. पहिल्याच गळीत हंगामात राज्यात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर, नुकताच ९२ कोटी रुपयांचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या यशामध्ये शरद पवार, अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान मोठे आहे.
आगामी काळातील सहकार क्षेत्रातील नवा टप्पा!
ही निवडणूक बिनविरोध झाल्यास मावळ तालुक्यातील सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. यामुळे संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आणखी मजबूत होईल आणि तालुक्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावेल.