Home Breaking News मुंबईचे पोलीस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन – पोलिस दलावर शोककळा!

मुंबईचे पोलीस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन – पोलिस दलावर शोककळा!

143
0

तेलंगणातील श्रीशैलम येथे झालेल्या भीषण अपघातात मुंबईचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे निधन झाले आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या एका नातेवाईकाचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

अपघात कसा झाला?

सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबाद येथे गेले होते. तेथे आपल्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी श्रीशैलमला जात असताना त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला!

सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सध्या ते मुंबई पोलीस दलात पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि न्यायप्रिय असल्यामुळे त्यांना सहकाऱ्यांमध्ये विशेष मानाचे स्थान होते. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने त्यांनी पोलिस दलात महत्वपूर्ण योगदान दिले होते.

सुधाकर पठारे यांचा प्रवास

सुधाकर पठारे हे अहमदनगर जिल्ह्यातील वाळवणे (ता. पारनेर) गावचे रहिवासी होते. त्यांनी एम.एस्सी. अ‍ॅग्री आणि एलएलबीचे शिक्षण घेतले होते. सुरुवातीला शासनाच्या विविध खात्यात अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून 1998 साली पोलिस उपअधीक्षक पद मिळवले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात पोलीस उपअधीक्षक, पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त आदी महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावली.

अपराध नियंत्रणात महत्त्वाची भूमिका

सुधाकर पठारे यांनी आपल्या कार्यकाळात मोक्का, एमपीडीए, तडीपारी अशा गुन्हेगारी विरोधी कायद्यांचा प्रभावी वापर करत अनेक संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा निःपात केला. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई आणि कोल्हापूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली होती.

पोलीस दलात पसरलेली हळहळ

सुधाकर पठारे यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच संपूर्ण पोलीस दल हळहळले आहे. त्यांच्या जाण्याने पोलिस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.