पुणे: काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षत्यागाच्या चर्चा रंगत होत्या, आणि अखेर त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सोडण्याचा अधिकृत निर्णय जाहीर केला.
“गेल्या १०-१२ वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असताना पक्षाशी एक कौटुंबिक नातं तयार झालं होतं. पक्षातील सहकारी हे माझ्या कुटुंबासारखेच होते. त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. मी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पक्षात राहून जनतेची कामं करता येत नाहीत,” असं धंगेकर यांनी सांगितलं.
“सत्ता नसल्याशिवाय लोकांना न्याय देता येत नाही!”
धंगेकर यांनी स्पष्ट केलं की, मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. “जनतेचं म्हणणं आहे की आमची कामं कोण करणार? लोकशाहीत सत्ता नसल्यास नागरिकांच्या अडचणी सोडवता येत नाहीत. त्यामुळे मी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला,” असं त्यांनी नमूद केलं.
एकनाथ शिंदेंशी चर्चा – नवीन प्रवासाची तयारी!
धंगेकर यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी माझ्या मतदारसंघातील विकासकामांना सहकार्य केलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांमुळे त्यांचा चेहरा जनतेमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील राजकीय वाटचाल करण्याचा विचार आहे.”
आज संध्याकाळी मोठी घोषणा!
रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं की, “आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाईल.” त्यांच्या या निर्णयाने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजकीय समीकरणं बदलणार?
धंगेकर यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या मतदारांवर याचा काय परिणाम होईल? धंगेकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत.