Home Breaking News तळेगाव आरोग्य केंद्रात लाच प्रकरण उघड! वैद्यकीय अधिकारी रंगेहात अटक

तळेगाव आरोग्य केंद्रात लाच प्रकरण उघड! वैद्यकीय अधिकारी रंगेहात अटक

98
0

तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेष सोपान गुट्टे (वय ५४) यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने ही कारवाई केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या मित्राला त्यांच्या वडिलांचे कुलमुखत्यारपत्र (Power of Attorney) तयार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता होती. मित्राचे वडील ब्रेन हॅमरेजमुळे अंथरुणाला खिळले असल्याने ते रजिस्टर ऑफिसमध्ये प्रत्यक्ष हजर राहू शकत नव्हते. त्यामुळे तक्रारदाराने प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे जाऊन डॉ. उन्मेष गुट्टे यांच्याशी संपर्क साधला.

डॉ. गुट्टे यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) दिली. त्यानुसार, १८ मार्च रोजी पुणे ACBच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून डॉ. गुट्टे यांना पंचांसमक्ष लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

पुढील कारवाई

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे मागितल्यास नागरिकांनी तातडीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नागरिकांनी सतर्क राहून अशा घटना तत्काळ संबंधित विभागाकडे नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.