रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांचा विशेष अभियान – नागरीकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई!
पुण्यातील कोंढवा परिसरात रात्रीच्या वेळी बुलेटच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज (फटाका वाजवण्याचा प्रकार) करून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरोधात कोंढवा पोलिसांनी धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. दि. १ मार्च २०२५ पासून रमजान महिना सुरू होणार असल्याने, या काळात नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून कोंढवा पोलिसांनी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष मोहीम हाती घेतली.
सायलेन्सर फटाका – एक ध्वनी प्रदूषणाचा विकृत प्रकार!
शहरातील अनेक बुलेट दुचाकीस्वार स्वतःची वाहने मॉडिफाय करून त्यांच्या सायलेन्सरमधून प्रचंड आवाज निर्माण करतात. या आवाजामुळे आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना, लहान मुलांना, आजारी व्यक्तींना तसेच १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतो.
कोंढवा पोलिसांची तडाखेबंद कारवाई – २० बुलेटस्वारांवर कारवाई!
कोंढवा पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान सायलेन्सर मॉडिफाय करून फटाके वाजवणाऱ्या वाहनचालकांना गाठून त्यांच्यावर कारवाई केली. एकूण २० बुलेट गाड्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून टाकण्यात आले.
मोठा संदेश – पुणे मनपाच्या रोड-रोलरखाली सायलेन्सर नष्ट!
आरोपी वाहनचालकांना इशारा देण्यासाठी आणि इतरांना धडा शिकवण्यासाठी कोंढवा पोलिसांनी जप्त केलेले हे २० मॉडिफाइड सायलेन्सर पुणे महानगरपालिकेच्या रोड-रोलरच्या सहाय्याने चिरडून नष्ट केले!
बुलेट रायडर्ससाठी धोक्याचा इशारा – नियम मोडाल तर कडक कारवाई होईल!
कोंढवा पोलिसांनी जाहीरपणे बुलेटस्वार आणि इतर दुचाकीस्वारांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मॉडिफाइड सायलेन्सर बसवणे, अनधिकृतरीत्या गाड्यांमध्ये बदल करणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि भविष्यात यावर अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि विशेष ऑपरेशन यशस्वी!
ही विशेष मोहीम पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ५, पुणे डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राऊफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.