पुणे शहरात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्वारगेट बस डेपोमध्ये पहाटेच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने विश्वासघात करत तिला शिवशाही बसमध्ये नेऊन हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (२६ फेब्रुवारी) पहाटे ५:३० वाजता ही घटना घडली. पुण्यातून फलटणला जाण्यासाठी निघालेल्या २६ वर्षीय तरुणीला आरोपीने दिशाभूल केली. बस कोणत्या स्टँडवर लागते, याबाबत चुकीची माहिती देत तिला अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. दरवाजा लावून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
आरोपीबद्दल धक्कादायक माहिती!
▪️ आरोपीचे नाव दत्तात्रय रामदास गाडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. ▪️ याआधीही गाडेवर चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. ▪️ अत्याचार केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आहे. ▪️ स्वारगेट पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत आहे.
CCTV फुटेजमध्ये आरोपी कैद!
तरुणीने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्वरित तपास सुरू करण्यात आला. स्वारगेट बस स्थानकातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली असून, त्यात आरोपी स्पष्टपणे दिसत आहे. त्यावरून त्याची ओळख पटली आहे.
महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न!
गजबजलेल्या बस स्थानकावर अशा पद्धतीने अत्याचार झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा कितपत आहे, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास
▪️ आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. ▪️ शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात देखील आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. ▪️ पुणे पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
पुणेकरांचा संताप!
पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा ही प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.