चिखली – कुदळवाडी येथे सलग सातव्या दिवशी १९२ एकर जागेत असलेल्या ६३३ अनधिकृत पत्राशेड बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. याठिकाणी असलेले अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे या कारवाईमध्ये निष्कासित करण्यात आले.
नियोजित विकास आरक्षणे आणि नागरी सुविधा जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेतून चिखली – कुदळवाडी येथे निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. याठिकाणी आज ८३ लाख ९७ हजार २४९ चौरस फूट बांधकाम निष्कासित करण्यात आले. यामध्ये एकूण ६३३ बांधकामाचा समावेश होता.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई हाती घेण्यात आली. या कारवाई वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर, राजेश आगळे, सीताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, शीतल वाकडे, अमित पंडित, सुचिता पानसरे, किशोर ननवरे, श्रीकांत कोळप, महेश वाघमोडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.